top of page
WEBSITE-TOP-WHITE-PATTI.jpg

Problems of blood donation movement in India

Updated: May 10, 2023

*भारतातील रक्तदान क्षेत्रातील समस्या व उपायांची शक्यता*


अत्यंत निस्वार्थीपणे समाजाची सेवा करणाऱ्या समाजसेवकांच्या कार्याला वंदन करूनच हे लिहीत आहे।गैरसमज नसावा .हे सर्व जण अपवाद आहेत।मी त्यांना सोडून इतरांबद्दल बोलणार आहे.


हा विषय भारतात अत्यंत गुंतागुंतीचा आणि भावनिक बनवून थोतांड झालेला विषय आहे यात कोणीही शंका बाळगू नका.यात काही आमूलाग्र बदल झाला तरच काही बदल होणे शक्य आहे..नाही तर नाही.

आता असा आमूलाग्र बदल घडवू शकतील अशा कोणत्या गोष्टी आहेत ते बघू.


1) बऱ्याच प्रगत देशात रक्त ही एक धंदा करण्याची वस्तू आहे आणि त्या धंद्याला कायदेशीर मान्यता आहे।त्याउलट भारतात सुद्धा हा धंदाच चालू आहे ज्याला कायदेशीर मान्यताच नाही।त्याला धंदा म्हणायला आपल्याला फार लाज वाटते कारण रक्तदान म्हणजे देशभक्ती हे फालतू थोतांड इथे माजेलेलं आहे।


2) ब्लडबँक ची परवानगीच मुळी समाजसेवा आणि ना नफा ना तोटा या तत्वावर मिळते।तसं लिहून दिलेलं असत परंतु नेमक काय होत ते आपण पहात आहातच।समजा तशी बँक चालवणं अवघड आहे अस समजून चालू। तसं असेल तर तशी अक्कल तुम्हाला ब्लड बँक चालू होण्याअगोदर नव्हती का? सर्व अर्थकारण माहीत करून न घेता कोणी ब्लड बँक टाकेल का?  समाजसेवेची अशी प्रचंड खाज असलेल्या ब्लड बँका आता हे परवडत नाही म्हणून धंदा करावाच लागतो असे समर्थन करीत आहेत। ब्लड बँक टाकायला कोणी तुम्हाला जबरदस्ती केली होती का? नाही ना? मग कशाला  हा निष्कारण उपदव्याप करायचा ? असो।


जगात एव्हडा एकच धंदा असा आहे ज्यात raw material कच्चा माल संपूर्णपणे फुकट मिळतो आणि पुढे प्रत्येक पायरीवर सर्व जण पैसे कमावतात।सांगा एक तरी धंदा असा आहे का? हेच खरं कारण आहे ब्लड बँक का टाकवीशी वाटते त्याची।निस्वार्थ समाजसेवा इत्यादी सर्व बंडल बाजी आहे।ब्लड बँक अत्यंत समर्थपणे चालवायची असेल तर सर्व आर्थिक बाबींचा विचार करावाच लागेल।नंतर रडगाणं गात बसण्यात काहीही अर्थ नाही।


 रक्त फुकट मिळणारच आहे, माझी अमक्याची ओळख आहे, तमका पुढारी मला मदत करील पुढं पाहून घेऊ अशा तकलादू पायावर हे लोक ब्लड बँक चालू करतात आणि नंतर अडचणी लक्षात आल्यानंतर रडत बसतात।ब्लड बँकेची स्थापनाच मुळी प्रत्येक हिशेब वस्तुस्थितीला धरून न केल्यामुळे आर्थिक दबघाईला येते आणि हा न सावरता येईल असा गोंधळ निर्माण होतो। ते टाळायला हवे।


ही फक्त एक बाजू झाली।ब्लड बँकेच्याही काही अत्यंत ग्राह्य अशा कित्येक अडचणी आहेत ते आपण कधी विचारातही घेत नाही।त्याचाही विचार व्हावा।


सखोल चर्चेत मला खालील सत्य गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या


1) आर्थिक उत्पन्नाचा इतर काही विभाग असल्याशिवाय फक्त एकच छोटी अशी स्वतंत्र ब्लड बँक कोणीही चालवू नये।अशक्य नाही परंतु समस्या खूप आहेत।ब्लड बैंक हॉस्पीटलशी सलग्न असेल किवा त्याचबरोबर औषधाचे दुकान किवा मेडिकल लैब इत्यादिअसेल तर ब्लड बँकेवरील आर्थिक बोजा कमी होवू शकतो 

ब्लड बँकांचा समूह चालवणं आर्थिक दृष्टीने तुलनेने जास्त परवडणारे ठरू शकते।मोठ्या प्रमाणावर सर्व खरेदी झाल्याने खर्च खूप कमी होतो


2) ब्लड बँक कुठं आहे हा ही अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे।मोठया शहरात ज्या ब्लड बँकेत मोठ्या प्रमाणावर रक्ताची उलाढाल होते ( दिवसभरात किती बॅग्स विकल्या जातात ) यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत। मोठ्या शहरात ब्लड बँक चालवणे हे तालुक्याच्या जागी ब्लड बँक चालवण्यापेक्षा नक्कीच जास्त फायदेशीर असू शकते।तालुक्याच्या गावी जर रक्ताची कायदेशीर देवाणघेवाण अधिकृत पैसे देऊन फार कमी असेल त्या ठिकाणी ब्लड बँक चालवणे अत्यंत अवघड असे काम आहे।याबद्द्ल मी स्वतः ग्रामीण भागातील ब्लड बैंक मालकाशी सखोल चर्चा केली आहे अणि सर्व हिशेब सुद्धा पाहिला आहे.


3) सरकार कोणत्याही पक्षाच असो, कोणतंही सरकार ब्लडबँक नियम पाळत नाही म्हणून फार कठोर कारवाई करू शकत नाही कारण पुन्हा मतांच राजकारण। तालुक्यातील ब्लड बँक कशीही चालो बंद पडता कामा नये म्हणून आमदार दबाव आणणार कारण आपल्या मतदार संघात लोक मरायला किंवा मारायला लागले तर लोक दोष देणार आमदारांलाच।ते तसे होवू देणार नाहीत। सरकारलाही रक्ताची जबादारी स्वतः घेतो अस सांगायची हिम्मत नाही म्हणून जस चाललंय ते चालू द्या ही भूमिका त्यांची नेहमी असते।


सरकारी अधिकाऱ्यांच तर बिचार्यांच काही विचारायलाच नको. "अहो आम्ही तरी काय करणार ? थोड़ समजून घ्या/आमचे हात बांधलेले आहेत हो" हे जनतेला सांगण्यासाठी ते पगार घेतात।काही तक्रार थातुर   मातुर कागदी घोड़े नाचवले जातात। आपण कारवाई झाली म्हणून ताबडतोब खुश..या कागदी कारवाई ला कोणीही फार किम्मत देत नाहीत हे सत्य आहे.एखाद उदाहरण देवून हे काही खर नाही हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न कोणीही करू नये। अर्थात सरकारी अधिकाऱ्यांचा सुद्धा सम्पूर्ण दोष आहे अस म्हणता येणार नाहीं कारण त्यांनाही प्रशासकीय कारवाई, आर्थिक खर्चाचे अधिकार, धोरणात्मक बाबी मधे सहभाग इत्यादि खुप प्रमाणावर दिल गेलेले नसतातच।ते तरी काय करणार?पोटभरु असल्याने काहीही हिम्मत नसते कारण अशी हिम्मत दाखवणाऱ्या नागपूर महापालिकेचे कमिशनर मुंढे साहेबांची कशी वारवार बदली करुन त्रास दिला जातो ते आपण बघतच आहात। बहुतांश सरकारी अधिकारी पोटभरु असल्याने अशी हिम्मत दाखवू शकत नाहीं।गरीब बिचारे। त्यांचा काहीही दोष नाही।त्यांच्यावर फार राग धरु नये आणि त्यांची नौकरी जाईल अस काहीही करू नये.कारण त्यानी फक्त मुलांसाठी माया गोळा केली आहे.अजुन नाटवंडासाठी काही कोटी जमवण बाकी आहे.


4)आम्ही समाजसेवक आहोत आणि रक्त मिळवून देतो अस म्हणणाऱ्या आणि ब्लड कॅम्प आयोजित करणाऱ्या कमिशन agent च पीक आता भारतभर आलेलं आहे।प्रत्येक ब्लड बॅग वर कट घेणाऱ्या लोकांनी रक्तदानाचे क्षेत्र पार बदनाम करूम टाकलं आहे आणि त्यामुळे अत्यंत निस्वार्थीपणे काम करणाऱ्या खऱ्या समाजसेवकांची सुद्धा नाहक बदनामी होते ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे।त्यात काही कमी होण्याची चिन्हे अजिबात दिसत नाहीत

प्रत्येक राज्यात स्वतः ला रक्तदान क्षेत्रातील भीष्माचार्य समजणारे किती भ्रष्टाचार्य आहेत हे प्रत्येक राज्यातील सर्व कार्यकर्त्यांना व्यवस्थित महित आहेत।ब्लड कैंप लावायचा, सर्वाकडून देश भक्ति म्हणून रक्तदान करवुंन घायच आणि ब्लड बॅंकेकडून प्रत्येक ब्लड बैग मागे। कमीशन घ्यायचे सर्व भारतभर चालू आहे.बहुतेक  ब्लड बैंक्स चालवणारे निर्लज्ज आहेत।त्याना ब्लड कैंप स्वतःच्या हिमतीवर आणि तो ही कोणत्याही दलालाला मधे न घेता लावायची इच्छाच नाही।पैसे देवून टाका म्हणजे मग ब्लड कैम्प ला गर्दी कशी आणायची याची चिंता नाही।पैसेही द्यायचे आणि पाठीमागे दलालाना शिव्या द्यायच्या आणि आपण त्यातले नाहीच हा आव आणायचा 

असा हा दुटप्पी खेळ सर्व भारतभर चालू आहे  अर्थात सर्वच ब्लड बैंक ऐसे करतात असे नाही।खुप निःस्वार्थीपणे करणाऱ्या ब्लड बैंक्स नक्कीआहेतच पण फार कमी. 


 5) ज्या हॉस्पिटल्स मधून रक्त ब्लड बँकेकडून मागवल जात तेथील डॉक्टर्स, ब्लड बँकेचे PRO, कमिशन घेणारे समाजसेवक अशा लोकांची साखळीच हा धंदा राजरोसपणे करीत आहेत।पुरावा देणं अवघड आहे कारण सर्वांचे हात ओले होतात।कोणीही सार्वजनिक रित्या बोलत नाहीत।ज्यांना हे सगळं 100 टक्के माहीत आहे ते फक्त कानात येऊन सांगतात तेही या अटीवर की आमचं नाव जाहीर करु नका।सगळ्याना सगळं काही माहीत आहे परंतु काही करणं पुराव्यानिशी देणं शक्य नसल्याने कारवाई करता येत नाही।


6) वेगवेगळ्या लोकांना कमिशन तक्रार न करता देणे, पुढाऱ्यांची विनाकारण दादागिरी आणि फोनवरूनच द्या रक्त, मी आहे ना, कुठं पळून चाललो आहे का? रक्त द्या नंतर बघू पैशाच आणि त्या नंतर पैसे न मिळणे हे आता नेहमीच झालं आहे।मला ज्यांनी हे सर्व आकड्यासह सांगितलं आणि या ज्यानी सर्व गोष्टीला वैतागून स्वतःची ब्लड बँक बंद का केली याचाही विचार झाला पाहिजे। ब्लड बैंक कशा चालवाव्या यावर पुनर्विचार करुन  नविन धोरण आवश्यक आहे 


7) सरकार चे 100 टक्के नियम रोजच्या रोज पाळणारी ब्लड बँक भारतात असेल असं वाटत नाही।अत्यंत कडक नियमावली, विविध प्रकारच्या रुग्णांना मोफत रक्त देणे, सर्व प्रकारच्या एजंटना कमिशन देणे, विविध जाचक अटी, ब्लड बँकेचा प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा पगार, AC विजेचे बिल, जागा, विविध उपकरणांचे मेंटेनन्स,consumable चा खर्च इत्यादी मुळे ग्रामीण भागातील तालुक्याच्या ठिकाणी चालू असलेल्या फक्त ब्लड बँक म्हणून काम करणाऱ्या छोट्या ब्लड बॅंका चालवणं हे फार प्रचंड नफ्याचा काम नक्की नाही।या सर्व गोष्टींचा सर्वकष विचार नव्या धोरणात करावा लागेल। 


8) नव्या धोरणात याही गोष्टींचा विचार व्हावा की ब्लड बँक कोणत्या भागात आहेत।ग्रामीण भागातील ब्लड बँक नीट कशा चालवता तेथील या साठी वेगळे धोरण ( कितीही विरोध असो ) ठरवले पाहिजे।तेथील आर्थिक समस्या मोठ्या शहरात असलेल्या ब्लड बँकापेक्ष्या नक्की वेगळ्या आहेत


9) रुग्णांचे नातेवाईक नेहमी रक्त घेण्यासाठी घोड्यावर बसूनच येतात।त्यांना सर्व काही फटाफट पाहिजे असत कारण रुग्ण गंभीर असतो।सर्व टेस्ट घाई घाई करून रक्त द्या अशी मागणी असते।या बद्दल रुग्णांच्या नातेवाईकांनीही थोडा संयम बाळगायला हवा।त्यातुनच ब्लड बँकेत भांडणे, शिवीगाळ होतात।असे वातावरण कोणासाठीही योग्य असू शकत नाही।


10) ज्या ब्लड बँका खोट्या गोष्टी सांगून आणि बनवाबनवी करून रुग्णाची फसवणूक करतात आणि अव्वाच्या सव्वा बिल लावतात त्याबद्दल तक्रार कशी करायची आणि त्याचा निकाल तावडतोब कसा लावायचा याचे धोरण ठरवावेच लागेल। परंतु त्या अगोदर ब्लड बँका आर्थिक दृष्ट्या सुरळीत चालण्यासाठो सर्व नियमावली बनवावी लागेल आणि त्याची अंमलबजावणी करावी लागेल।एखाद्याला मारहाण करणे, गुन्हा दाखल करून कोर्टात जाणे, तुरुंगात टाकणे किंवा ब्लड बँक बंद करणे हा काही दीर्घकालीन उपाय होऊ शकत नाही।हे ज्यांना हवे असेल त्यांनी पुरावा, वेळ आणि पैसे असतील तर भांडण आणि कोर्ट केसेस नक्की कराव्या परंतु ते केल्याने काहीही फरक पडणार नाही। जे काही करायचं ते दीर्घकालीन सुरळीत चालणाऱ्या अशा रक्तदानाची चळवळी साठी धोरणात बदल करायचे आहेत ।


या झाल्या जर आणि तरच्या गोष्टी।भविष्यात होतील किंवा न होतील कारण सर्व सुरुवातीला सांगितली आहेतच।

आता मुद्दा आहे अशा सर्व गुंतागुंतीच्या परिस्थितीत आपल्याला काय करता येईल?


अ) भारतात रक्तदानाचे हजारो व्हाट्सअप्प ग्रुप्स आहेत आणि त्या मुळे लोकांना रक्तही मिळत आहे परंतु याच ग्रुप्स मूळे कमिशन एजंट आणि ब्लड बँकेचे फावले आहे।कोण कोणाला रक्त देतो, कस आयोजन करतो, कोण श्रेय घेतो, कोण कोणाची कशी बदनामी करतो, कोणी हे आमचे रक्तदाते आहेत त्यांना तुम्ही कस बोलावता अशी थिल्लर चर्चा करतात। हा माझा पेशन्ट तो फक्त आम्हीच बघणार तुम्ही बघायचा माही, ही आमची ब्लड बँक आणि हे आमचं हॉस्पिटल, इकडे तुम्ही यायच नाही।एक ना सतरा अशा थिल्लर गोष्टीत लोकांना प्रचंड रस आहे।व्हाट्सअप्प आल्यापासून या गोंधळात प्रचंड भर पडली आहे। एका ब्लड request वर किती लोक जाऊन रक्त देतात याच्यावर नियंत्रण नाही। ती पूर्ण झाली की नाही याचा काहीही हिशेब नाही।तीच तीच ब्लड request दिवसेंदिवस फिरत राहते हे सर्वाना माहीत आहे ।


ब) ब्लड कॅम्प आयोजित करण्यासाठी भारतात बहुतेक सर्व ब्लड बँका विविध संस्था, समाजसेवक किंवा दलाल आणि पुढारी यांच्यावर अवलंबून राहतात।ब्लड कॅम्प आयोजित करण्याची पहिली प्राथमिक आणि मूलभूत कायदेशीर जबाबदारी हो ब्लड बँकेची आहे।ही जबाबदारी ते पार पाडत नाहीत आणि त्यामुळेच त्यांना दलाल लोकापुढे झुकावे लागते आणि त्यांचे सर्व ऐकावे लागते। कोणत्याही रुग्णाला रक्त मिळवून देण्याची सर्व प्रथम लिखित जबाबदारी ही ब्लड बँकेची आहे।त्यानंतर ती रुग्णाच्या कुटुंबियांची आहे आणि त्यानंतर ती जरूर पडल्यास समाज सेवकांची आहे।रुग्णांचे नातेवाईक आणि ब्लड बँक यांचे सशक्तीकरण करायचे असेल तर तंत्र ज्ञानाचा उपयोग करावाच लागेल। मी माझ्या आयुष्याची कमाई आणि कर्ज काढून ब्लडीफास्ट मोबाईल अँप बनवले आहे।त्यात अजूनही त्रुटी आहेत।कुठून तरी कर्ज मिळाल्यास त्यात खूप सुधारणा करायच्या आहेत। 

अर्थात हेच अँप वापरा अस मुळीच नाही।पाहिजे ते वापरा परंतु आपल्या अँप मध्ये ज्या सोइ आहेत त्या इतर अँप मध्ये नाहीत हे नक्की।तरी सुद्धा मी हेच म्हणेन की कोणतेही अँप किंवा वेबसाइट वापरा परंतु सगळा गोंधळ कमी कसा करता येईल ते पहा।नविन तंत्रद्यान आपण जो पर्यन्त विपरीत नाही तोपर्यंत सुधारणा होण्याची कहिहि शक्यता नाही जर आपण अँप मध्ये ब्लड डोनर्सचा डेटा टाकला तर आपण रुग्णांच्या नातेवाईकांनाया सरळ हे सांगू शकता की अँप मध्ये जा आणि रक्तदाते शोधा, त्यांना फोन लावून विनंती करा आणि बोलावून घ्या। सर्व समाजसेवकांनी सगळी काम बाजूला ठेवून ही ढोरमेहनत का करायची? तुम्ही जे करता तेच करायला रुग्णांच्या नातेवाइकाना करायला भाग पाडा। एखादी दुसरी बॅग लागणार असेल तर ती जबाबदारी घेऊच नका।रुग्णांचे कुटुंबीय आणि मित्र मंडळी आणि शेजारी पाजारी याना रक्तदान करायला भाग पाडा।ते जमत नसल्यास अँप मध्ये शोधा म्हणून सांगा।सर्व लोकांना अत्यन्त लाडावून ठेवल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे।

सामाजिक कार्य करणार्या कार्यकर्त्यांनी फक्त त्याच वेळी मदत करावी ज्या वेळी रुग्ण अत्यंत गरीब आहे याची खात्री असेल किंवा रुग्ण दुसऱ्या शहरात उपचारासाठी आला असेल किंवा खूप जास्त रक्त अचानक लागत असेल।फक्त याच वेळी मदत करावी।इतर सर्व प्रकरणात ब्लड बँक आणि रुग्णांचे नातेवाईक यांनी लक्ष घालावे।आपण सर्वानी नाही। ही शिस्त जो पर्यंत लागत नाही तो पर्यंत काहीही बदल होणार नाही।

समाजसेवकाना इतर काहिही काम धंदा नाही आणि भरपूर वेळ आहे अस समजूनच रुग्णाचे कुटुम्बीय रक्तदाता मिळवण्याची स्वतःची जबाबसरी समाजसेवकांच्या डोक्यावर ढकलत असतात।हे बंद करावे लागेल  

आपल्याला पाहिजे त्या अँप मध्ये आपले सर्व रक्तदाते टाका।रक्तदात्यांच्या यादीवर फक्त रुग्णांचा अधिकार असतो। मध्यस्थ लोकांचा नाही हे लक्षात घ्या। रक्तदात्यांचा असा प्रचंड डेटा अँप मध्ये टाकल्याने दोन गोष्टी साधता येतील।


1) रुग्णांचे नातेवाईक स्वतः रक्त शोधू शकतील


2) ब्लड बँकांचे सशक्तीकरण होईल।कोणावरही अवलंबून न राहता ब्लड बँक स्वतः च ब्लड कॅम्प एका झटक्यात आयोजित करू शकतील आणि तो आयोजित ब्लड कॅम्प सर्व रक्तदात्यांच्या मोबाईल फोनवर आपोआप दिसायला लागेल।कोण रक्तदान करायला येणार आहे किंवा नाही यांची यादी ताबडतोब आयोजकांना त्याच्या स्वतःच्या फोनवर आपोआप दिसायला लागेल अशी सोय अँप मध्ये केलेली आहे

हे सर्व करायचं असेल तर सर्वाना आपल्या स्वतःच्याच कार्यपद्धतीत बदल करावा लागेल। श्रेय घेणे, सत्कार गल्लोगल्ली करणे, रक्तदानाचा प्रचंड बाऊ करणे, एकमेका शी स्पर्धा करणे, पाठ फिरताच एकमेकाची बदनामी करणे हे बंद करावे लागेल।पाहिजे त्या अँप मध्ये रक्तदात्यांच्या डेटा ताबडतोब टाकून रुग्णाचे नातेवाईक आणि ब्लड बँकाचे सशक्तीकरण करावे लागेल।


भारतात अजुनही 1 टक्के लोक रक्तदान करीत नाहीत ही मोठी शोकांतिका आहे।आपण आपला वेळ रक्त आयोजित करण्यात घालवण्यापेक्षा जास्त  वेळ हा सोशल मीडियातून जनजागृती करण्यसाठी घालवावा। त्याचे प्रशिक्षण घ्यावे।आपण जेव्हा अखिल भारतीय बैठक घेऊ त्यावेळी सोशल मीडिया ट्रेनिंग साठी एक दिवस पूर्ण खास राखून ठेवणार आहोत।देहदान , नेत्रदान, त्वचादान, आणि अवयवदान यांच्या जन जागृती साठी स्मशानभूमीत बॅनर लावण्याचे काम नक्की करावे।नेमक्या मनस्थितीत आणि कमित कमी खर्चात मोठी जन जागृती होऊ शकते।कॉलेज आणि शाळा तसेच हॉस्पिटल्स आणि क्लिनिक मध्ये थॅलेसेमिया च्या standees लावण्याचे काम करावे लागेल।त्याशिवाय ग्रामीण भागात जन जागृती होण शक्य नाहीं..शाळा कॉलेज किंवा शहरात जाहीर सभा घेऊन आणि स्टेजवर थॅलेसेमिया झालेंल्या मुलांना आणून किंवा न आणून त्यांना 10 तरुण रक्तदात्याशी जोडून देण्याचे काम जो पर्यंत सुरू होत नाही तो पर्यंत ग्रामीण भागातील मुलांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होणार नाही।आपल्या अँप मध्ये तशी सोयच केली आहे परंतु त्याकडे कोणाचेही लक्ष नाही।त्यात आणखी काही बदल मी पुढे कधी तरी करणार आहे।सध्या पैसे नाहीत।त्यासाठी कोणीही आर्थिक मदत करीत नाहीत परंतु हे असंच असतं। तशी अपेक्षा ठेवणच चुकीचं आहे हे मी समजू शकतो।


भारतात रक्तदान 1 टक्काही का होत नाही त्याच कारण म्हणजे सार्वजनिक रित्या विविध माध्यमातून ज्या वाईट बातम्या येतात त्यामुळे तरुण रक्तदाते पुढे येत नाहीत।


१) माझ्या रक्ताचा धंदाच होणार असेल तर मी रक्त का द्यावे?2) रक्त वाया जात असेल आणि फेकून देत असतील (भलेही योग्य कारणासाठी असेल जे त्यांना माहीत नाही) मी रक्त का द्यावे? 3) मी रक्तदान केल्यानंतर मला जेव्हा रक्त पाहिजे असेल आणि मला कोणत्या न कोणत्या कारणासाठी पैसे भरावे लागत असतील तर मी रक्त का द्यावे? अशा रास्त कारणासाठी तरूण रक्तदानासाठी पुढे येत नाहीत।


त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी फक्त एकच काम सर्व प्रथम हाती घ्यावे।रक्तदात्याला स्वतःला जेव्हा रक्त पाहिजे असेल ते त्याला सर्व टेस्टिंग करून ( कृतज्ञता म्हणून, मेहेरबानी म्हणून नव्हे) एक पैसाही न भरता मिळावे या साठी आंदोलन करायचे तर आंदोलन करा।हे झाल्यास बघा किती तरूण पुढे येतात ते।सर्व ब्लड बॅंक्स भरतील।आपण जी धावपळ करीत आहात तीही करावी लागणार नाही।यावर विचार करावा।माझ्या ऍप साठी ज्यानी मदत केली आहे त्या सर्वांचा मी ऋणी आहे. माझ्याबद्द्ल काहीही माहीत नाही परन्तु विनाकारण पोटदुखी आहे आणि काहींचा राग आहे तर काहीं लोक वाट्टेल ते बोलतात याच फार नवल वाटत।या सर्व लोकाबद्दल माझ्या मनात कोणताही राग नाही फक्त किव वाटते।अशा सर्व लोकानाही  माझ ऍप वापरायचा मोह होईल एव्हढ ऍप चांगल बनवण एव्हडा एक प्रयत्न मात्र मी पुढची कमित कमी १०-१५ वर्षे जरूर करणार आहे ( जगलो वाचलो तर) माझ्या अँप साठी मी जे काही करायचं आहे ते आयुष्यभर करणार आहेच।ते जो पर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत मी आपला निरोप घेत आहे।जो पर्यन्त जगभर लाखो लोकांचे प्राण माझ्या ऍप मुळे वाचत नाहीत तोपर्यंत मी काम करणार आहे कोणालाही काहीही वाईट वाटून घे


कोणाचाही अपमान करण्याची जाणीवपूर्वक इच्छा नाही।सर्वाच भल कशात आहे एव्हडा एकच विचार माझ्या मनात असतो।कोणाशीही व्यक्तिगत राग नाही ।कोणत्याही सत्कार समारंभात माझे नाव टाकू नये ही नम्र विनंती।

सर्वांचा आता निरोप घेतो।सगळ्याना शुभेच्छा।

सदैव आपलाच 

अजित वहाडणे,मुंबई 




38 views1 comment
yIUTUBE_edited.png
bottom of page